एक राज्य एक गणवेश योजना | One State One Uniform Scheme Guidelines

 एक राज्य एक गणवेश योजना

One State One Uniform Scheme
One State One Uniform Scheme

योजेनेचे निकष - 

महाराष्ट्र राज्यामध्ये भारत सरकारच्या समग्र शिक्षा अभियान अंतर्गत मोफत गणवेश योजना शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवी मध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली, अनुसूचित जाती मुले , अनुसूचित जमाती मुले तसेच दारिद्रय  रेषेखालील पालकांची मुले यांना लागू आहे. 

योजनेसाठी आर्थिक तरतूद -

या योजनेअंतर्गत सन 2023 - 24 या वर्षी प्रति लाभार्थी दोन गणवेश संचासाठी  600/- रुपये प्रमाणे रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे . त्यापैकी एका गणवेश संचासाठी  300 /- रुपये प्रमाणे तरतूद शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेली आहे. 

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई चे राज्य प्रकल्प संचालक श्री कैलास पगारे  यांनी दिनांक 29 मे 2023 रोजी एक परिपत्रक काढून गणवेश वाटपाबाबत महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत.  

गणवेश वाटपाबाबत महत्वाच्या सूचना - 

1) या योजनेअंतर्गत सन 2023 - 24 या वर्षी प्रति लाभार्थी दोन गणवेश संचासाठी  600/- रुपये प्रमाणे रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे . त्यापैकी एका गणवेश संचासाठी  300 /- रुपये प्रमाणे तरतूद शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेली आहे. 

2) इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेशित तसेच शाळेत नव्याने प्रवेश घेतलेल्या निकष पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना एक गणवेशंच शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्फत निर्धारित करण्यात आलेला गणवेश वितरित करण्यात यावा. सदर योजनेच्या लाभांपासून गणवेश पात्र लाभार्थी वंचित राहणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी.

3) लाभार्थी विद्यार्थ्यांना द्यावयाच्या दुसऱ्या गणेशा बाबत शासन स्तरावरून प्राप्त होणाऱ्या सूचनानुसार कार्यवाही करावी. दोन्ही गणवेश वापराबाबत शासनाच्या सूचनानुसार मुख्याध्यापक यांनी कामकाज करावे.

4) शाळा व्यवस्थापन समित्यांना अनुदान वितरणास विलाभ होऊ नये म्हणून सदरचे अनुदान जिल्हास्तरावरून थेट तालुकास्तरावर PFMS प्रणालीच्या माध्यमातून वितरित करण्यात यावे व शाळा व्यवस्थापन समितीने गणवेश वितरणाची कार्यवाही विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून गणवेश खरेदी करावे व देयकांची अदाएगी करण्याकरिता संबंधित प्रमाणाचे व उप क्रमानाके तालुकास्तरावर सादर करावे.

5) राज्य शासनाचे सामाजिक न्याय विभाग, आदिवासी विभाग, अल्पसंख्यांक विभागामार्फत अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी गणवेश अथवा शासनमान्य वसतीगृहातील विद्यार्थ्यांना गणेशाचा लाभ दिला जात असल्यास अशा लाभार्थ्यांना समग्र शिक्षा अंतर्गत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येऊ नये. एकाच विद्यार्थ्यास दुबार गणवेशाचा लाभ अनुज्ञेय होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी.

ज्या महानगरपालिकांकडून त्यांच्या स्वनिधीमधून महानगरपालिकांतर्गत शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश उपलब्ध करून देण्यात येतो. अशा लाभार्थी विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अंतर्गत गणवेशाचा दुबार लाभ देण्यात येऊ नये.

6) वरील नमूद प्रमाणे प्रस्तावित एक गणवेश वितरणाच्या अनुषंगाने शालेय गणवेशाचा रंग, प्रकार, स्पेशिफिकेशन इत्यादी बाबी संदर्भात संबंधित शाळेच्या व्यवस्थापन समितीने त्यांचे स्तरावर निर्णय घ्यावा.

7) प्रस्तावित प्रमाणे एक गणवेश वितरणाबाबत संपूर्ण अधिकार संबंधित शाळेच्या शाळा व्यवस्थापन समिती असल्याने, शाळा व्यवस्थापन समिती स्तरावरून निर्णय घेण्यात यावा.

8) प्रत्येक शाळा व्यवस्थापन समिती स्तरावरून त्यांच्या शाळेतील गणेश पात्र लाभार्थ्यांच्या वयोगटांनुसार व विद्यार्थ्यांच्या मापानुसार ( Size प्रमाणे) मुलांसाठी आणि मुलींसाठी गणवेश खरेदी करून वितरित करावे.

9) गणवेश शिलाई पक्क्या धाग्याची असावी. शिलाई निघाल्यास, गणेशाचे कापड फाटल्यास अथवा गणवेशाबाबत कोणतीही तक्रार उपस्थित झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीची राहील.

10) प्रस्तावित प्रमाणे सध्या प्रती लाभार्थी एक गणवेश संचाकरिता करिता रू. 300 /- तरतुदीपेक्षा अधिकचा खर्च होणार नाही. याचे दक्षता देखील संबंधित शाळा व्यवस्थापन समितीने घेणे आवश्यक आहे. रु 300/- तरतुदीपेक्षा ज्यादा खर्च झाल्यास जादा झालेला खर्च मान्य केला जाणार नाही.

11) प्रत्येक जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी ( प्राथमिक ) यांनी सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना गणवेश योजनेची अंमलबजावणी करण्यासंदर्भात सूचना द्याव्यात व गटशिक्षणाधिकारी यांनी त्यांच्या गटातील संबंधित शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक घेऊन समग्र शिक्षा अंतर्गत मोफत गणवेश वितरणाबाबत योग्य मार्गदर्शन करावे.

12) गणवेश खरेदी देयकांचे अदायगी संबंधित शाळा व्यवस्थापन समितीने PFMS प्रणालीच्या माध्यमातून करावी. गणवेश पुरवठा दारास रोखीने अदायगी करू नये. अदायगी केल्याबाबतचे अभिलेखे, संपूर्ण हिशोबाच्या अचूक नोंदी तसेच दस्तऐवज जतन करून ठेवावेत. लेखा परीक्षणावेळेस लेखापरीक्षकास संपूर्ण दिनांकासह हिशोबाची माहिती व अभिलेखे, उपलब्ध करून देता येतील, याप्रमाणे लेखा विषयक बाबींच्या नोंदी ठेवण्यात याव्यात.

13) शाळा स्तरावर स्टॉक रजिस्टर ठेवण्यात यावे. सदर रजिस्टर मध्ये गणवेश वितरणाचा दिनांक व गणवेश मिळाल्याबाबत संबंधित लाभार्थी विद्यार्थ्यांची व त्यांच्या पालकांची स्वाक्षरी/ अंगठ्याचा ठसा घेणे आवश्यक आहे

14) गणवेश वितरणाबाबतची कार्यवाही झाल्यानंतर भारत सरकार यांचे प्रबंध पोर्टलवर झालेल्या खर्चाची नोंद तात्काळ करण्यात यावी. मंजूर तरतुदी मधील रक्कम शिल्लक असल्यास, सदरची तरतूद याच वित्तीय वर्षात राज्यस्तरावर जमा करावे व त्याबाबतची नोंद ठेवण्यात यावी.

15) शिक्षणाधिकारी ( प्राथमिक) जिल्हा परिषद यांनी त्यांच्या जिल्ह्यातील गणवेश वितरणाचे सर्व गटांचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार त्यांच्या जिल्ह्यांचा संकलित अहवाल व उपयोगिता प्रमाणपत्र महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई कार्यालयास व शिक्षण संचालक( प्राथमिक)  शिक्षण संचालनालय, पुणे या कार्यालयास ऑगस्ट 2023 अखेर सादर करावे.

16) वितरणामध्ये विलंब होणार नाही. तसेच गणवेश पात्र लाभार्थी सदर योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता संबंधित शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षण विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, महानगरपालिका प्रशासन अधिकारी व जिल्हा परिषद, शिक्षणाधिकारी (प्राथमिक ) यांनी घेणे आवश्यक आहे.

17) प्रस्तावित प्रमाणे गणवेश पात्र सर्व लाभार्थी विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी सध्या एक गणवेश संच वितरित होणे आवश्यक आहे. या अनुषंगाने योग्य नियोजन करून उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या तरतुदीचा विनियोग करण्यात यावा.

सदरचे  मा. प्रकल्प संचालक यांचे पत्र खालील लिंक वर क्लिक करून पाहू शकता. 


मोफत गणवेश वितरणा संदर्भात दिनांक 08 जून 2023 रोजी महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय काढून काही मार्गदर्शक सूचना केलेल्या आहेत. त्या खाली पाहू शकता . 

स्काऊट व गाईड शिक्षण आणि गणवेश - 

स्काऊट व गाईड शिक्षणाचे संस्कार क्षमता विचारात घेऊन राज्यातील शाळांमध्ये स्काऊट शिक्षणाचा समावेश करण्यात येणार आहे. सदर स्काऊट व गाईड विषयाच्या शिक्षणासाठी वेगळा गणवेश निर्धारित करण्यात आलेला आहे. त्यानुसार आवश्यक असणारा वेगळा गणवेश सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थ्याकडे उपलब्ध नाही.

त्यामुळे प्रस्तुत शाळांमधील विद्यार्थ्यांना स्काऊट व गाईड या विषयास अनुरूप असणाऱ्या गणवेश उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यामुळे मोफत गणवेश योजनेअंतर्गत संपूर्ण राज्यातील पात्र विद्यार्थ्यांना स्काऊट व गाईड विषयास अनुरूप एकसमान एक रंगाचा दर्जेदार गणवेश उपलब्ध करून देण्याकरिता सदर योजनेच्या अंमलबजावणीमध्ये शासनाने बदल केलेला आहे.

महत्त्वाच्या सूचना - 

1) मोफत गणवेश योजनेअंतर्गत सन 2023 - 2024 या शैक्षणिक वर्षांमध्ये पात्र विद्यार्थ्यांना दोन गणवेशाचा लाभ शाळा व्यवस्थापन समिती मार्फत देण्यात यावा. यासाठी केंद्र शासनाने निर्धारित केलेल्या दराप्रमाणे निधी राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद ,मुंबई यांनी वितरित करावा.

2) मोफत गणवेश योजनेअंतर्गत अनेक शाळांनी व कापड उद्योजकांनी शिक्षण विभागाच्या पूर्वपरवानगीशिवाय सन 2023-  24 या वर्षांसाठीचे गणवेश तयार करण्याचे काम केले आहे. सदर तयार गणेशामुळे संबंधितांचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून शासनाने शाळा व्यवस्थापन समितीस उपलब्ध करून दिलेल्या निधीमधून सन 2023 - 24 या शैक्षणिक वर्षासाठी एक गणवेश शाळा व्यवस्थापन समितीने निश्चित केल्यानुसार विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात यावा.

3) गणवेश असा असेल - 


👉 मुलांसाठी गणवेश - विद्यार्थ्यांना उर्वरित एक गणवेश स्काऊट व गाईड विषयास अनुरूप शाळा व्यवस्थापन समिती मार्फत देण्यात यावा. यामध्ये मुलांसाठी आकाशी रंगाचा शर्ट आणि गड निळ्या रंगाचे हाफ पँट किंवा फुल पँट.

👉 मुलींसाठी गणवेश -  तसेच मुलींसाठी आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाचा स्कर्ट किंवा ज्या शाळांमध्ये सलवार कमीज असेल तर सलवार गडद निळ्या रंगाचे व कमीज आकाशी रंगाची असेल.

तसेच विद्यार्थ्यांच्या शर्ट वरती शोल्डर स्ट्रीप ( Shoulder Stripe) व दोन खिसे ( Double Pocket) असणे आवश्यक आहे.

4) स्काऊट व गाईड विषयासाठी आवश्यक असणाऱ्या गणवेशांमधील टोपी व संस्कार या संदर्भात नव्याने आदेश शासन स्तरावरून देण्यात येतील.

5) स्काऊट गाईडच्या गणेशा बाबत आवश्यक ती सर्व माहिती महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने सर्व संबंधितांना उपलब्ध करून देण्यात यावी.

6) गणवेश वेळापत्रक - 

स्काऊट व गाईड या विषयाच्या तासिका आठवड्यातून दोन दिवस असतात. त्यापैकी एक तासिका शक्यतो शनिवारी असते.

त्यामुळे मंगळवार, गुरुवार व शनिवार या तीन दिवशी स्काऊट व गाईड विषयास अनुरूप उपलब्ध करून देण्यात येणारा गणवेश विद्यार्थ्यांनी परिधान करणे आवश्यक राहील.

तसेच उर्वरित सोमवार बुधवार व शुक्रवार या दिवशी शाळा व्यवस्थापन समितीने निश्चित केलेल्या रंगाचा गणवेश विद्यार्थ्यांनी परिधान करण्यात यावा.

पुढील वर्षाचे गणवेशाबाबत चे नियोजन - 

पुढील शैक्षणिक वर्षापासून म्हणजेच सन 2024 - 25 पासून शासनाच्या वतीने सर्व शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना स्थानिक महिला बचत गटामार्फत शिलाई करून एकसमान एक रंगाचे दोन गणवेश उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

त्यामुळे सन 2024-25 या शैक्षणिक वर्षांमध्ये मोफत गणवेश योजनेबाबत स्थानिक स्तरावर कोणतीही कार्यवाही करण्यात येऊ नये.


समग्र शिक्षा अभियान अंतर्गत मोफत गणवेशा बाबतचा  8 जून 2023 चा शासन निर्णय खालील लिंक वर पाहू शकता .     

                                          


हेही नक्की वाचा -  इयत्तानिहाय व विषयनिहाय तासिका इयता पहिली ते आठवी


नवनवीन माहितीसाठी - 

खालील ग्रुप मध्ये सामील होऊ शकता.

Whatsapp Group Link - https://chat.whatsapp.com/BzEMSOuUCHh4fNDTkYUQqw

Telegram Group Link - https://t.me/+8M9UPC68PIA2NTFl

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या